गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

                         महिन्याभरापूर्वी आजऱ्याच्या बसस्थानकावरील ८०-९० वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड तोडण्यात आले . सबब होती झाडाच्या जीर्ण फांद्या प्रवाशांच्या डोक्यात पडत होत्या . मला जसा याबद्दलचा फोन आला तसा तडक बस स्थानकावर गेलो . अतिशय चुकीच्या पद्धतीने झाडाची कत्तल करण्यात आली होती . मी आजूबाजूच्या लोकांकडून यासंदर्भात माहिती घेतली . त्यानंतर वनविभागाच्या कार्यालयातून परवानगी संदर्भातील माहिती घेतली . तिथून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे झाडाची कत्तल , त्याचे ' valuation ' , त्याचा लिलाव ह्या सर्व बाबी कागदोपत्री जरी योग्य वाटत असल्या तरी आक्षेपार्ह होत्या . मी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी डेपो म्यानेजारांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी सगळे रीतसर झाले असल्याचे दाखवण्यास सुरुवात केली . वनविभागाची परवानगी , तहसीलदारांची परवानगी , लिलाव , किंमत याबद्दलची सर्व कागदपत्रे त्यांनी मला दाखवण्यास सुरुवात केली . ती कागदपत्रे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले कि , हि परवानगी झाड्याच्या फांद्या तोडण्यासंदर्भात दिली गेली होती .
                        मी यासंदर्भात वृक्षमित्र अनिल चौगुलेंशी संवाद केल्यानंतर त्यांनी मला याविषयातील मोलाचे मार्गदर्शन केले . मग मी दुस-या भेटीत यासंदर्भात डेपो म्यानेजरांशी चर्चेला बसून या सर्व प्रकरणात त्यांनी केलेल्या चुका दाखवून दिल्या . मग त्यांनी यासंदर्भात काय करावे असे विचारल्यावर मी त्यांना सांगितले कि , यावर तुम्हाला २५ झाडे लावण्याचे प्रायश्चित घ्यावे लागेल असे मी सांगितले . कारण ह्या बाबीत जितके कायदेशीर डावपेच होतील त्यातून छोट्या मोठ्या आर्थिक दंडाव्यतिरिक्त काहीच हाती लागणार नव्हते . झाड तर तुटले होते ; त्याचे क्लेश आम्हाला होताच . डेपो म्यानेजर काकुळतीला आले होते ; पण फक्त कायदेशीर कारवाई होईल म्हणून . मी त्यांना झाडाच्या वाळलेल्या फांद्या योग्य पद्धतीने कश्या तोडता आल्या असत्या याबद्दल सांगितले . मी हि या विषयावर वेगळ्या आणि योग्य ( माझ्या मते ) तोडगा काढला होता . मी डेपो म्यानेजरांना सांगितले कि त्यांनी बस स्थानकाच्या परिसरात स्थानिक प्रजातीची २५ झाडे लावावीत ; आणि रोज त्यांना मुबलक पाणी घालावे . डेपो म्यानेजारांनी का कु करत हे कबूल केले . आज बस स्थानक व डेपोच्या परिसरात आंबा - २ , वड - ४, सप्तपर्णी - २ , महोगणी - २ , जांभूळ - ४ , हिरडा - ३ , रेन ट्री - ३ , पिंपळ - २ , जारुळ - ३ व शक्य झाल्यास बहाव्याची झाडे लावण्याचे ठरले आहे . डेपो म्यानेजरांनी हि झाडे कागलच्या नर्सरीतून आणली आहेत . अनिल दादांनी हि झाडे आता लावली तरी जगतील असे सांगितले आहे . बघू आता डेपो म्यानेजर कधी लावतात हि झाडे . बाकी मी डेपो म्यानेजरांना आता पुन्हा उरलेली झाडे तोडू नका अशी विनंती केली ………. त्यांनी हसत नकारार्थी मान हलवली होती !